ओळख आणि संस्कृती

साजरे होणारे सण

शिमगा :- गावामध्ये शिमग्याचा सण दिमाखात साजरा केला जातो. ढोल ताश्यांच्या गजरात देवांना रूप लाऊन पालखीत बसवून सहाणेवर आणल जात. पौर्णिमेला आंब्याच्या झाडाची होळी उभी केली जाते व भद्रेचा होम केला जातो. रात्री पारंपारिक पद्धतीने नमनाचा (कोकणचे खेळे) कार्यक्रम होतो. गोमुचा नाच , फिरते नमन याची मज्जा वर्षातून एकदाच अस म्हणत प्रत्येकजण यात सहभागी होतो. या सणाला प्रत्येकाच्या घरी पालखी जात असल्याने एक वेगळीच उत्सुकता असते. गावातील लोक , चाकरमानी, पै – पाहुण्यांनी या सणाला गाव गजबजून जात.

गुढीपाडवा :- गुढी उभारणे हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे. गुढीपाडवा हा नवीन सुरुवात, आनंद आणि निसर्गातील चैतन्याचा उत्सव आहे. पाडव्याला बांबूच्या काठीला आंब्याचा टाळा, रेशमी वस्त्र, कडुलिंबाची पाने, फुलांचा हार आणि साखरेची माळ घातलेली असते.  गुढीला तांब्याचा कलश उलटा ठेवतात. ह्या दिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाचे अभिष्टचिंतनही केले जाते.

गणेशोत्सव :- गणपती बाप्पाच्या आगमनाने  गणेशोत्सवाला सुरुवात होते. पण त्याआधीच मखर करावयाची सुरुवात झाल्यावरच गणपतीची चाहूल लागते.  गावात प्रत्येक घरी कोणी दीड दिवस , कोणी ५ दिवस तर कोणी १० दिवस गणपतीची प्रतिष्ठापना करतात.  बाप्पाच्या नैवेद्यासाठी खास उकडीचे मोदक केले जातात. संध्याकाळी घरोघरी सामुदायिक आरती केल्या जातात. रात्री भजन, जाकडी नृत्य व टिपरी नृत्य असे कार्यक्रम केले जातात. गणपती नंतर  गौरी माहेरी येते आणि सर्व लेकी सुनांची मने मोहून टाकते. “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या” अशा भावपूर्ण जयघोषाने बाप्पाला निरोप दिला जातो. विसर्जनाच्या दिवशी निर्माल्य गोळा करून गावाने एक वेगळी ओळख तयार केली आहे. एक शिमगा आणि दुसरा गणेशोत्सव या सणांना गावातील सर्व घरे उघडी दिसतात.

दिवाळी :- गावामध्ये दिवाळी सण अत्यंत आनंद, उत्साह आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. शहरांपेक्षा गावातील दिवाळी अधिक आपुलकीची आणि सामूहिक असते. दिवाळीच्या काही दिवस आधीच गावात घरांची साफसफाई केली जाते. घर, अंगण आणि ओसरी स्वच्छ केली जाते. नवीन वस्त्रं, भांडी, सजावटीच्या वस्तू खरेदी केल्या जातात. दिवाळीत विविध प्रकारचे पारंपारिक गोड पदार्थ आणि फराळ बनवून शेजारी, नातेवाईक यांच्यात देवाण घेवाण करतात.  अनेक ठिकाणी खास पारंपारिक पूजा आर्च्या केल्या जातात. दगड मातीने मुलांनी बनविलेले किल्ले हे गावातील दिवाळीचे आकर्षण आहे. दिवाळी वाईटावर आणि अंधारावर प्रकाशाचा विजय म्हणून साजरी केली जाते.

स्थानिक मंदिरे

वळके गावामध्ये प्रवेश केल्यानंतर थोड्याच अंतरावर असलेल्या ग्रामदैवत श्री. धावजेश्वर वाघजाई मंदिर आहे. तसेच राम मंदिर , साई बाबा मंदिर , हनुमान मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर, श्रीकृष्ण मंदिर , जांगलदेव मंदिर ही मंदिरे असून गावातील ही मंदिरे शांततेचे प्रतिक आहेत. येथील प्रत्येक मंदिरात वार्षिक उत्सव साजरे केले जातात.

वारसा स्थळे

पांडवकालीन गुहा :- एका भव्य दगडामध्ये कोरलेली ही गुहा आहे. याठिकाणी पांडव अज्ञात वासात असताना वास्तव्यात होते, अशी आख्यायिका सांगितली जाते. बाजूला बारमाही पाणी असलेले पाण्याच कुंड आहे. तसेच
पोखरलेली धोंड, मुरकुंडी कोंड, अनेक ठिकाणी कडे आणि त्यावरून वाहणारे धबधबे गावाच्या निसर्गरम्य वातावरणात भर टाकतात.

गौरवशाली व्यक्ती

स्वातंत्र्यसैनिक :- कै.  सखाराम लक्ष्मण सावंत, कै. मधुकर गंगाराम सावंत

भजन कलाकार :- कै. रविंद्र मधुकर सावंत

नाट्य कलाकार :- तन्वी विजय सावंत,  ज्योती कृष्णा ताम्हणकर

लोककला

नमन, जाकडी , भजन , फुगडी , टिपरी नृत्य या वळके  गावातील लोककला आहेत.  येथे शिमगोत्सव, होळी आणि गणेशोत्सव या काळात पारंपारिक सण, नृत्य आणि संगीताशी घट्ट नाळ जोडलेल्या या लोककला सादर करताना गावकऱ्यांचा आनंद ओसंडून वाहत असतो.  गावातील तरुण तरुणीची साथ स्थानिक संस्कृतीचा वारसा पुढे जपण्यासाठी खूप मोलाची आहे.

स्थानिक पाककृती

वळके गावातील स्थानिक पाककृती महाराष्ट्राच्या कोकणाच्या पारंपारिक चवींवर आधारित आहेत. येथे मोदक , पुरणपोळी , नाचणी भाकरी , गावठी अंडी, पिठलं भाकरी   यांसारख्या पारंपरिक पदार्थांना विशेष महत्त्व आहे. सणावार आणि उत्सवाच्या वेळी या पदार्थांची खास तयारी केली जाते. समुद्रकिनारी असल्यामुळे ताजी मासळी वापरून बनवलेले पदार्थ आणि कोकम, तिखट व नारळाचे स्वाद या पाककृतींना खास अद्वितीय चव देतात. गावातील प्रत्येक घरात पारंपारिक पद्धतीने स्वयंपाक केला जातो आणि हा स्थानिक वारसा पुढे नेला जातो.

हस्तकला

वळके गावातील हस्तकला हा स्थानिक संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. येथे पारंपारिक मातीचे दगडी शिल्प, विणकाम, झोपाळ्यांच्या आणि घरगुती सजावटीच्या वस्तूंचे कारागिरी आढळते. तसेच, बुरूडकाम, मातीच्या गणपती, देवी-देवतांचे मूर्तिकला, रंगीत रांगोळी कला या हस्तकलेतून गावाची सांस्कृतिक ओळख दिसून येते. या कला-हस्तकलेमुळे वळके गावाची परंपरा, कलात्मक कौशल्य आणि स्थानिक वारसा जतन होतो.

FPO गटांची माहिती आणि त्यांचे कार्य

गावामध्ये उमेद ग्रामीण जीवनोन्नत्ती अभियानाच्या माध्यमातून १७ समूहांची (बचत गटाची) निर्मिती झाली आहे. त्या सर्व समुहांचा मिळून सावित्री ग्रामसंघ तयार झाला आहे. समूहाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होऊन महिला सक्षमीकरणास चालना मिळाली आहे.